परदेशात गेलेल्या भारतीयांची आणि शहरात राहणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश ; ‘टुर्स अँड ट्रॅव्हल’, ‘हॉटेल-लॉज’ची जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल, लॉज, हॉटेल तसेच गेस्ट हाऊस चालकांना परदेशात गेलेल्या तसेच आलेल्या सर्वांची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी असे सांगण्यात आले आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात असून, पुण्यातील 16 जणांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच आरोग्य विभाग पुर्ण खबरदारी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात सर्वोतोपरी खबरदारी घेत आहे.

शहरात टुर्सद्वारे अनेक नागरिक परदेशात जातात. तर अनेक परदेशातून पुण्यात येतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना त्याची लागण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून या सर्वांची नोंद करण्यात यावी. सर्वांनी त्यांच्या नोंदी ठेवून त्याबाबत त्या- त्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

तर, सहली, उद्योजक किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे परदेशात जाण्याचे आयोजन केले जाते. ते करू नये असेही आदेश पोलिसांनी दिले आहेत. अपवादात्मक परिस्थिती असल्यास तशी परवानगी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.