शहरातील घरफोड्याचे सत्र कायम ! चतुःश्रुगी परिसरात एकाच वेळी 9 दुकाने फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लॉकडाऊन काळात बंद झालेल्या घरफोड्याचे सत्र पुन्हा सुरू झाले असून हडपसर, मुंढव्यात फ्लॅट फोडल्याची घटना ताजी असताना चतुःश्रुगीत एकाच रात्री चोरट्यांनी 9 दुकाने फोडली आहेत. व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी रमेश चौधरी (वय ३४, रा. ग्रीनपार्क सोसायटी, औंध) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे परिहार चौकात रमेश मिनी मार्केटचे किराणा दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील २७ हजारांची रोकड चोरुन नेली. त्यासोबतच चोरट्यांनी त्याच परिसरात असलेल्या गो कलर्स, सनशाईन होजिअरी, एलेन सॉली, शुज एक्सप्रेस, पुनम कलेक्शन, एशियन पेंटस, बास्किन रॉबिन्स, गोकुळ स्वीट्स दुकानांमधील २७ हजार ५०० रुपयांची रोकड चोरुन नेली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत आहे. त्यानुसार चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एम. ए. जाधव करीत आहेत.