पुणे शहरातील घरफोड्याचे सत्र थांबेना, बाणेरला 4 दुकाने फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात सुरू झालेले घरफोड्याचे सत्र सुरूच असून, चतुःश्रुगी भागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्याभरात 17 दुकाने फोडण्यात आली आहेत. यानंतर देखील पोलिसांना या घटना रोखता येत नसल्याचे दिसत आहे. त्यातच बुधवारी आणखी 4 दुकाने फोडल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी अनिल आगरवाल (वय ५१, रा. बाणेर ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगरवाल यांचे पाषाण परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. संध्याकाळी सहानंतर त्यांनी दुकान बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील १५ हजारांची रोकड चोरुन नेली. त्याशिवाय चोरट्यांनी उत्तम सुपर मार्केट, हरिओम सुपर मार्केट आणि बालाजी सुपर मार्केट दुकाने देखील फोडत चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सतत होणाऱ्या या घटनांमुळे येथील व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिन्याभरात एकाच भागात 17 घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. तर एकाच दिवशी 9 दुकाने फोडण्यात आली होती. त्यामुळे एका प्रकारे चोरट्यांनी पोलिसांनाच पकडण्याचे आव्हान दिल्या सारखे झाले आहे. चोरटे येऊन आपली चोक कामगिरी पार पाडत आहेत. तर दुसरीकडे पोलीस त्यांना शोधण्यात अपयशी ठरत असते.

—चौकट—

स्थानिक पोलिसांना या घटना रोखण्यात अपयश असले तरी गुन्हे शाखेच्या पथकांना या चोरट्यांना पकडणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखा आता फक्त लॉकडाऊनच्या काळात छापेमारी करणे व घटनास्थळी भेट देऊन वापस येणे इतकेच ते काय करत आहेत. शहरात गुन्हेगारी वाढत असताना गुन्हे शाखा नावालाच उरली असल्याचे आता दबक्या आवाजात बोलले जाऊ लागले आहे. काही पथक बोटावर मोजण्या इतके काम करत आहेत. पण काही तर केवळ नावालाच राहिले आहेत. महिन्या-दोन महिन्यांतून एक कारवाई करायची अन त्यावर महिना काढायचा असेच सुरू असल्याचे सांगण्यात आले.

—-कोट—-

चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने दुकाने फोडीच्या घटना होत आहे. त्यापाश्र्वभूमीवर अहवाल मागवून संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्यावर कारवाई करुन त्यांची बदली करण्यात येईल.