पुण्यातील हडपसरमध्ये 4 लाखाची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, हडपसर परिसरात बनावट चावीने घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी सव्वा चार लाखांवर डल्ला मारला आहे. 7 ते 15 मार्च कालावधीत ही घटना घडली.

याप्रकरणी गणेश जवादवाड (वय 49, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश एका खासगी कंपनीत कामाला असून गाडीतळ परिसरातील पर्ल टॉवरमध्ये राहण्यासाठी आहेत. 7 ते 15 मार्च कालावधीत ते कुटूंबासहित बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप बनावट चावीने उघडले. त्यानंतर घरातील रोकड, सोन्याचे दागिने मिळून 4 लाख 24 हजारांचा ऐजव चोरुन नेला. गावाहून माघारी आल्यानंतर गणेश यांना घरामध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जोशी अधिक तपास करीत आहेत.

घरफोड्या करणार्‍या तीन अल्पवयीन मुले ताब्यात
कोंढवा परिसरात घरफोडी करणार्‍या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 4 गुन्ह्यातील 2 लाख 88 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. कोंढवा पोलिस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आशिर्वाद चौकात एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्याने इतर दोघा साथीदारांच्या मदतीने कोंढवा परिसरात चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.