पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, कोंढव्यात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून दिड लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. तर, दुसर्या घटनेत एटीएम मशिनमध्ये चोरी करताना दोघांना पकडण्यात आले आहे.
श्रीराम विकास हनवते (वय 26, रा. चिखली) आणि रामेश्वर बळीराम देशमुख (वय 24, रा. देशमूख टाकळी, ता. परळी, जि. पुणे) अशी एटीएम मशिनमध्ये चोरी करताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
येवलेवाडी परिसरात बँक ऑफ बडोदाचे एटीएम केंद्र आहे. फिर्यादी एटीएम मशिनची देखभाल पाहतात. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एटीएम मशिन फोडत असताना याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी हे दोघे मशिनमध्ये चोरी करताना आढळून आले. दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
तर, कोंढव्यातील साईबाबानगर परिसरात बंद फ्लॅट फोडण्यात आला आहे. याबाबत समीर शेख (वय 43) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख हे फिर्यादी हे कुटूंबियासोबत घराला कुलूप लावून शुक्रवारी दुपारी रत्नागिरी येथे कामानिमित्त गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. तसेच, घरातील दागिने व रोकड असा दिड लाखांवर डल्ला मारला. रविवारी समीर शेख हे परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास कोंढवा पोीलस करत आहेत.