Pune : कोंढव्यात सव्वा चार लाखाची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात बंद फ्लॅट दिसताच चोरटे हातसफाई करत असून, कोथरुडला 5 फ्लॅट फोडले असताना कोंढव्यात एक फ्लॅट फोडून सव्वा चार लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मईनअली खान (वय ३९, रा. कोंढवा ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हे कोंढव्यातील साईबाबानगरमधील नजीर हाईट्समध्ये राहायला आहेत. कामानिमित्त ते २३ ते ३० सप्टेंबर कालावधीत बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि जुनी घड्याळे मिळून ४ लाख २५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. गावाहून परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक स्वराज पाटील करीत आहेत.

दरम्यान शहरात पुन्हा एकदा घरफोड्याचा सुळसुळाट झाला आहे. चोरटे बंद फ्लॅट दिसताच तो फोडत आहेत. यामुळे पोलिसांची गस्त अन पेट्रोलिंग नेमकी असते कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात मात्र सर्व सामान्य माणूस भरडला जात आहे. जमवलेली पै-पै हे चोरटे एका रात्रीत गायब करत आहेत.