पुण्यातील बाणेर परिसरात घरफोडी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबविला

शहरातील घरफोड्याचे सत्र थांबत नसून बाणेर परिसरात बंद खोली फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पंकज विश्वनाथ भंगाळे (वय ३९, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे किरणक्रियटर अँड डेव्हलपर्स या ठिकाणी नोकरीला आहेत. या कंपनीमार्फत बाणेर परिसरात वायरिंगचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीकडून वायरिंगच्या ८९ कॉईल खरेदी केल्या होत्या. त्या कॉईल काम सुरू असलेल्या साईटवरील एका खोलीत ठेवण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी एक सुरक्षारक्षक देखील राहण्यास आहे.

मात्र, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या खोलीचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्या कॉईलपैकी दोन लाख २१ हजार रुपये किंमतीच्या सहा कॉईल चोरून नेल्या. या ठिकाणी कंपनीचे इंजिनिअक पाहणी -करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना खोलीचा दरवाजा उघडला दिसला. त्यांनी पाहणी केल्यानंतर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चतुःश्रुंगी पोलिस करत आहेत.