Pune : उरुळी कांचनमधील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये कोरोना काळातही माणुसकीचे दर्शन : उद्योजक सुभाष साठे

पुणे : खासगी रुग्णालयामध्ये भरमसाठ बिले आकारली जातात, रुग्णांना लुबाडले जाते, अशा तक्रारी सरसकट असतात. मात्र, त्यालाही काही अपवाद असतात, त्यातील उरुळी कांचन (ता. हवेली)मधील विट्ठल हॉस्पिटल ठरले आहे. फक्त बिलाबाबतीतच नव्हे, तर वैद्यकीय आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी कोरोना महामारीमध्ये दिलेली सेवा खासगी रुग्णालयांवरील आरोप खोडून काढले. कोरोना महामारीमध्ये रुग्णांसाठी विठ्ठल हॉस्पिटलने माणुसकीचे दर्शन घडविले, असे मत भावरापुरचे माजी सरपंच उद्योजक सुभाष साठे
यांनी व्यक्त केले.

उरुळी कांचन येथील विट्ठल हॉस्पिटलमधील डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉपर्यंतच्या सर्वच देवदूतांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन साठे यांनी केले होते. याप्रसंगी उरुळी कांचनचे माजी उपसरपंच युवराज कांचन, डॉ. गिरीश शिंदे, डॉ. अरविंद मचाले, डॉ. राम मचाले, डॉ. अमोल म्हेत्रे, डॉ. प्रज्ञा मचाले, डॉ. सोनल शिंदे, राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नितीन करडे, बाळासाहेब कांबळे आणि विठ्ठल हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयसह सर्वच कर्मचारी उपस्थित होते.

उरुळी कांचनमधील विठ्ठल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश शिंदे म्हणाले की, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा करण्याचा निश्चय केला आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाही, हाताला कामधंदा नाही, पैसा नाही, अशी भयावह अवस्था आणि त्यातच कोरोनाच्या भीतीने नागरिक सैरभैर झाले आहेत. त्यांना आधार देत उपचार करणे, हे आमचे आद्यकर्तव्य समजून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, साठे म्हणाले की, मागिल काही महिन्यापासून कोरोना महामारीमध्ये सर्वच शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि त्यांचे सहकारी रात्रंदिवस जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाबाधित व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यापासून कोरोनामुक्त होईलपर्यंत कुटुंबीयांची घालमेल होत असते. मात्र, रुग्ण नव्हे, तर माणुस म्हणून विठ्ठल हॉस्पिटलमधील डॉक्टरसह सर्वच स्टाफ काम करताना मी स्वतः जवळून पाहिले. कोरोनामुक्त झाल्यानंतरसुद्धा जवळचे नातेवाईकसुद्धा सुरक्षित अंतर ठेवून स्वागत करतात. मात्र, हॉस्पिटलमधील सर्वच मंडळी अगदी जवळून औषधोपचार आणि खाणेपिण्याची सुविधा देतात, त्यामुळे त्यांना देवदूत हीच पदवी योग्य आहे. विठ्ठल हॉस्पिटल नावाप्रमाणेच विठ्ठल आहे. फक्त सेवाच नाही, तर रुग्ण दाखल होताना पैसे असो वा नसो उपचार करण्याला प्राधान्य देणारे रुग्णालय अशीच ओळख आहे. रुग्ण हाच केंद्रबिंदू मानून सर्व स्टाफ काम करत असल्याने समाधान वाटत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.