Pune/Indapur : पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यात चिंकारा जातीच्या हरीणाची शिकार; वन विभागाकडून दोघांना अटक अन् अग्नीशस्त्रे जप्त

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) –  चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करण्यास जंगलात शिरलेल्या दोघांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. पकडण्यात आलेल्या दोघांनी गोळी घालून हरणाची शिकार केली असून, मृत अवस्थेतील हरीण मिळाले आहे. मंगळवारी रात्री ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे.

महेश जंगलु मने (वय 40, रा. सनसर, ता. इंदापूर) व दत्तात्रेय पोपट पवार (वय 42, रा. बोरी, इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी जंक्शन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री इंदापूर वनपरिक्षेत्रात कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना जंगलात बॅटरीचा उजेड दिसला. त्यामुळे त्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली. तर दोघे दुचाकीवर संशयास्पद अवस्थेत दिसले. पण, त्याचवेळी या दोघांनी कर्मचाऱ्यांना पाहिले आणि पळ काढला. कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असलेल्या एका गोणीत चिंकारा जातीची हरीण मृतावस्थेत सापडले. त्यांनी बंदुकीने या हरणाची शिकार केली होती. त्यांच्याकडून 9 बोरची रायफल, 6 जिवंत काडतुसे आणि 1 वापरलेले काडतूस जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल जंक्शन अशोक नरुटे व वनरक्षक पूजा काटे यांच्या पथकाने केली आहे. या कारवाई दरम्यान ग्रामस्थ अतुल नरूटे, विनोद नरूटे, संदीप नरूटे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी (इंदापूर) राहुल काळे करीत आहेत.

तुमच्या आजुबाजुला किंवा परिसरात कोणत्याही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाचे जवळचे कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचार्‍यांना तात्काळ देण्यात यावी तसेच हॅलो फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.