Pune : ‘महिलांना हनुमान मंदिरात जाण्यास मनाई’ असल्याचे म्हटल्याने पती-पत्नीला बांबुने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हनुमान जयंती निमित्ताने हनुमान मंदिरात आलेली महिला पाहून मंदिरात जाण्यास महिलांना मनाई असे असे बोलल्याने राग आल्याने मंदिरात आलेल्या एकाने पतीपत्नीला बांबुने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार भवानी पेठेतील फकीर मोहम्मद सोसायटीखालील हनुमान मंदिरात २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडला होता.

याप्रकरणी विशाल तुलसीदार जेदिया (वय ४०, रा. हार्मनी बिल्डिंग, वानवडी) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जित नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हनुमान जंयतीनिमित्त जेदिया हे आपली पत्नी व बहिणीसह हनुमान मंदिरात गेले होते. त्यावेळी हनुमान मंदिरात अचानक एक बाई आत गेली. त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या बहिणीला ‘‘ही बाई कोण आहे. हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे,’’ असे बोलत होते. त्यावेळी तेथे असलेल्या जित नावाच्या तरुणाला राग आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यावरुन त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे भांडणात रुपांतर होऊन तरुणाने फिर्यादी व त्यांची पत्नी यांना बांबुने मारहाण करुन जखमी केले. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.