Pune : पत्नीचा खून करून तब्बल 21 वर्षांपासून होता फरार, ग्रामीणच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुसक्या आवळल्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पत्नीचा खुन केल्यानंतर या गुन्ह्यात गेल्या 21 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला पुणे ग्रामीणच्या दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. 1999 मध्ये हे खून प्रकरण घडले होते.

अंकुश पुत्या जाधव (वय ६०, रा. बहुली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1999 साली अंकुश याने त्याच्या पत्नीचा रागाच्या भरात खून केला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यावेळेपासून तो पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान तो फरार काळात जंगलात राहिला आहे. तो गावात येत नसे.

दरम्यान पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथक या गुन्हेगारांचा माग काढत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी मोसिन शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पिरंगुट येथे शाळेजवळ एकजण आला आहे. तो कोणता तरी गुन्हा करून फरार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. दोघेही पती-पत्नी दारू पिल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून हा खून झाला होता. त्यांना दोन मुलं होती. त्यातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे. तर दुसरा मूलगा नेमका कुठे आहे याची माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक उपनिरीक्षक विश्वास खरात, राजू पवार, पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, महेंद्र कोरवी किरण कुसाळकर, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.