धक्कादायक ! पुण्यात पतीनेच पत्नीचा फोटो टाकला सोशल मीडियावर आणि लिहिलं ‘कॉल गर्ल’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून ‘कॉल गर्ल’ म्हणून सोशल मीडियावर पत्नीचा छेडछाड केलेल्या फोटो व मोबाईल नंबर टाकून, तो फोटो नातेवाईकांना पाठवून पतीने पत्नीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

२१ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली असून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती दारु पिऊन त्रास देत असल्याने पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. याचा राग मनात धरुन पतीने स्वतःच्या पत्नीचा फोटो कॉल गर्ल म्हणून सोशल मीडियावर टाकला. तसेच नग्न महिलेच्या फोटो मध्ये एडिट करुन पत्नीचा चेहरा त्या फोटोला लावून आपली पत्नीच असल्याचे भासवले. तसेच पत्नीचा मोबाईल नंबर ही टाकला.

हा फोटो त्याचे पत्नीच्या नातेवाईकांना पाठवून पत्नी देहविक्रीचा धंदा करत असल्याचे एमएमएस बनवून इतरांना पाठवून पत्नीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात येताच तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.