Pune : मुंबईला रेमडेसिवीर मिळतं तर पुण्याला का नाही? सभागृह नेते गणेश बीडकर यांचं FDA ला पत्र

पुणे : करोना रुग्णांच्या उपचारासाठी फायदेशीर ठरणारी दोन लाख रेमडीसिव्हीर इंजेक्शन मुंबई महापालिकेला मिळतात मग पुणे महापालिकेला का मिळत नाही? असा प्रश्न सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विचारला आहे. मुंबई पालिकेप्रमाणेच पुणे पालिकेला किमान ५० हजार रेमडीसिव्हीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बिडकर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तांकडे केली आहे.

दोन ते अडीच महिन्यांपासून शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने हॉस्पिटल सुरू केली आहेत. सद्यस्थितीत शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलसह अन्य सहा हॉस्पिटलमध्ये १६९० करोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेला दररोज एक हजार रेमडीसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता असते. ही गरज भागविण्यासाठी पालिकेने संबधित कंपन्यांना वर्क ऑर्डर देऊन इंजेक्शन खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. सिप्ला, मायलेन यासह मोठ्या वितरकांना देखील पालिकेने संपर्क करून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र हे इंजेक्शन केवळ राज्य सरकारला देण्याचे आदेश असल्याने हे इंजेक्शन पालिकेला देण्यास संबधित कंपन्यांनी असमर्थता दाखविली आहे.

मुंबई पालिकेने हाफकिन कंपनीकडे ७ एप्रिलला इंजेक्शन खरेदीची मागणी केली होती. त्यानुसार २० एप्रिलला दोन लाख इंजेक्शन मुंबई पालिकेला देण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. त्याचे आवश्यक ते शुल्क देखील मुंबई पालिकेने भरले आहे. मुंबई पालिकेला थेट इंजेक्शनची खरेदी करता येऊ शकते मग पुणे महापालिकेला वेगळा न्याय का? मुंबई पालिकेच्या धर्तीवर पुणे पालिकेला किमान ५० हजार रेमडीसिव्हीर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्यावीत, असे महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते बिडकर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यासाठीचे शुल्क भरण्याची पालिकेची तयारी असून याबाबत आवश्यक त्या सूचना तातडीने देऊन इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.