Pune : परिस्थिती सर्वसामान्य राहील्यास मार्च अखेरीस महापालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपये होईल – अति. मनपा आयुक्त रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे महापालिकेला आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकर, बांधकाम परवानगी, जीएसटी तसेच विविध विभागांच्या वतीने उत्पन्न वाढीसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांच्या माध्यमातून मार्चअखेर पर्यंत साडेचार हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा दावा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केला आहे.

रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संध्याकाळी सर्व विभाग प्रमुखांची महापालिकेच्या सद्य आर्थिक परिस्थितीविषयी आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प असताना कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि उपचार यंत्रणा उभारणे यावर मोठा खर्च झाला आहे. तर दुसरीकडे लॉकडाउनचा फटका बसल्याने बांधकाम, मिळकतकर व अन्य विभागांच्या माध्यमातून तुलनेने अत्यल्प उत्पन्न मिळाले आहे. सर्वसाधारण सभेने सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. दरवर्षी अंदाजपत्रकात सुचविलेल्या पेक्षा १८ ते २० टक्के तूट येते. यंदा ही तूट वाढण्याची शक्यता असून याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होणार आहे. अशातच येत्या १ डिसेंबरनंतर प्रशासनाने आगामी आर्थिक वर्ष अर्थात २०२०-२१ चे अंदाजपत्रक तयार करण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेला ३० ऑक्टोबर अखेर मिळालेले उत्पन्न, झालेला खर्चा, १ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०२१ पर्यंत अपेक्षित उत्पन्न आणि खर्च याचा प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यासाठी रुबल अग्रवाल यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

यासंदर्भात बोलताना रुबल अग्रवाल म्हणाल्या, की १५ नोव्हेंबर पर्यंत महापालिकेला २ हजार ५४८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर आतापयर्र्ंत २ हजार ४२८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या महापालिकेकडे १२० कोटी रुपये शिल्लक आहेत. आढाव्या दरम्यान घनकचरा, ड्रेनेज आणि भामा आसखेड योजनेवर ४० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. अन्य विभागांचा खर्च हा ४० टक्क्यांच्या आतमध्येच आहे. महसुली खर्च हा न चुकणारा असल्याने ती देणी द्यावीच लागतात.
मिळकतकर विभागाचे उत्पन्न समाधानकारक आहे. लॉकडाउनमुळे राज्यातील अन्य महापालिकांमध्ये मिळकतकराच्या उत्पन्नाला फटका बसला असताना पुणे महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. महापालिकेने अभय मिळकतकरावरील दंडामध्ये सवलतीची अभय योजना राबविली आहे. शेवटच्या टप्प्यात शासकिय व निमशासकिय विभागांकडून कर भरला जातो. राज्य शासनाकडून जीएसटीची रक्कम येणार आहे. तसेच लॉकडाउन नंतर बांधकाम विभागाचे उत्पन्न वाढण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून भाडे वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच अन्य विभागांच्या उत्पन्न वाढीच्या योजना लवकरच कार्यन्वीत होत आहेत. अनलॉकची परिस्थिती अशीच राहील्यास महापालिकेला साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.