Pune : म्युकर बुरशीची लक्षणे आढळली तर त्वरित उपचार करून घ्या – डॉ. संजय धर्माधिकारी

पुणे : कोरोना महामारीमध्ये म्युकर नावाची बुरशी या आजाराने डोके वर काढले आहे. म्युकर ही बुरशी सर्वव्यापी आहे. माती, ओल्या भिंती, पालापाचोळा आदीमध्ये आढळून येते. कोरोनाबाधित झाल्यावर जर गालावर सूज, बधीरपणा, वेदना, जखम दिसली किंवा नाक गच्च होणे, नाकाला रक्तमिश्रित पाणी, पू (फस) येत असेल व डोळ्यात वेदना, अंधुक दिसणे, डोळ्याची हालचाल नीट न होणे जाणवले, हिरड्या बधीर होणे, दात हलणे, टाळूला जखम दिसली तर त्वरित कान नाक घसा तज्ञाला भेटून म्युकर नाही ना याची खात्री करून घ्या. नाकात दुर्बीण टाकून निदान लवकर झाल्यास म्युकर डोळ्यात व मेंदूत जाण्याचा धोका टळतो. कोरोनाबाधित रुग्णाची वरचे वर रक्तातील साखर तपासावी, जर ती १८० चे वर जात असल्यास त्वरीत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करून घेणे आवश्यक आहे, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय धर्माधिकारी यांनी सांगितले.

डॉ. धर्माधिकारी म्हणाले की, म्युकर ही बुरशी सर्वव्यापी आहे. माती, ओल्या भिंती, पालापाचोळा इत्यादी ठिकाणी दिसून येते. कारोना महामारीच्या पूर्व काळातदेखील ज्यांची रोगप्रतिकार शक्ती मधुमेह, कॅन्सरमुळे क्षीण झाली आहे. त्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीचा प्रादुर्भाव क्वचित आढळून येत होता. कोरोना महामारी आणि मधुमेह हे एकत्र असणे म्युकरसाठी पोषक आहे. म्यूकरमुळे नाकातून रक्त येणे, श्वासाला त्रास होतो, नाकातून डोळ्यामध्ये गेले, डोळ्याला सूज, दृष्टी कमी होते, डोळ्याची हालचाल बंद होते, डोळ्यातून मेंदूपर्यंत जाऊ नये म्हणून सर्जरी करून डोळा काढून टाकावा लागू शकतो. मेंदूपर्यंत बुरशी पोहोचली, तर रुग्ण दगावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाकाला त्रास होऊ लागला, तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करून घेणे क्रमप्राप्त आहे,

कोरोना महामारीच्या उपचारात काही वेळा जीवरक्षक म्हणून स्टरोईड औषधे वापरावी लागतात. परंतु, त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. ती नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. म्युकर ही बुरशी नाकावाटे मानवी शरीरामध्ये प्रवेश करते. रक्तातील साखर जास्त असेल, तर वेगाने सायनस, डोळे, मेंदू बाधित होतात.

कोरोनाबाधित झाल्यावर जर गालावर सूज, बधीरपणा, वेदना, जखम दिसली किंवा नाक गच्च होणे, नाकाला रक्तमिश्रित पाणी, पू (फस) येत असेल व डोळ्यात वेदना, अंधुक दिसणे, डोळ्याची हालचाल नीट न होणे जाणवले, हिरड्या बधीर होणे, दात हलणे, टाळूला जखम दिसली तर त्वरित कान नाक घसा तज्ञाला भेटून म्युकर नाही ना याची खात्री करून घ्या. नाकात दुर्बीण टाकून निदान लवकर झाल्यास म्युकर डोळ्यात व मेंदूत जाण्याचा धोका टळतो. कोरोना पेशंटने वरचे वर रक्तातली साखर तपासून १८० चे वर जात असल्यास त्वरीत डॉक्टरशी संपर्क साधावा. बागेत, शेतात काम करताना मास्क नक्की वापरा. म्युकरने बाधित झालेला भाग काळा पडत असल्याने त्याला काळी बुरशी म्हणतात. डोळे व मेंदू व सायनसचा एमआरआय स्कॅन करून आजाराची व्याप्ती समजते. नाकातील स्राव बुरशीसाठी प्रयोग शाळेत पाठवून निदान पक्के होते. सर्जरी लवकर करून नाकातील व सायनसचा बाधित झालेला भाग काढून टाकला, तर डोळे व मेंदू बाधित होणे टळते. त्यानंतरदेखील बुरशी नाशक औषधे देणे आवश्यक असते. डॉक्टरांना न विचारता अँटिबायोटिक, स्टरोईड, टॉनिक घेणे टाळावे. महत्वाचे म्हणजे म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही, असे डॉ. धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले.