Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर बेकायदेशीर आंदोलन; आझाद समाज पार्टीच्या 10 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात असलेल्या निवासस्थानासमोर बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी आंदोलन करताना पोलिसांशी झटापट करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. शासकीय नोकरीतील एससी, एसटीचे पदोन्नतीची आरक्षण महाराष्ट्र सरकारने रद्द केल्याच्या आरोपावरून आझाद समाज पार्टीतर्फे हे आंदोलन करण्यात आले होते.

चतुःशृंगी पोलिसांनी भीमराव दत्तू कांबळे (वय 31), अभिजीत मधुकर गायकवाड (वय 32), रफिक रुस्तुम शेख (वय 37), अंकित परशुराम गायकवाड (वय 21), दर्शन बाबुराव उबाळे (वय 25), दत्ता मोहन भालशंकर (वय 38), विनोद लक्ष्मण वाघमारे (वय 34), महेश वैजनाथ थोरात (वय 21), सागर विरभद्र जवई (वय 23) आणि शरद गौतम लोखंडे (वय 23) यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी फिर्याद दिली आहे.

आझाद समाज पार्टीचे सर्वजन सदस्य आहेत. राज्य सरकारने शासकीय नोकरीतील एससी, एसटी वर्गाचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याचा गैरसमज या सर्वांचा झाला. त्यावरून त्यांनी कोणतीही परवानगी न घेता व गैर कायद्याची मंडळी जमा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील भोसलेनगर येथील जिजाई बंगल्यासमोर सोमवारी दुपारच्या सुमारास आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मोठ्या आवाजात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून दहशत निर्माण. यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर फिर्यादी हे त्यांना ताब्यात घेत असताना त्यांनी फिर्यादी यांच्याशी झटापट केली. तसेच ते कर असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.