Pune : बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जिम्स, क्रीडासंकुल सील करावीत : डॉ. कुणाल खेमनार

पुणे – कोरोनाच्या साथीमध्ये निर्बंध असतानाही शहरात काही ठिकाणी बॅडमिंटन हॉल, जिम्स सुरू आहेत. क्रीडा आयुक्तांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जिम्स आणि बॅडमिंटन हॉलसह जलतरण तलाव आणि इन डोअर गेम हॉलची तपासणी करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर मार्च मध्ये संपूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आले. टप्प्याटप्य्याने काही सुविधा वेळेचे निर्बंध घालून सुरूही करण्यात आल्या आहेत आणि काही सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेसला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मैदानी खेळ व व्यायामाना परवानगी दिली असली तरी जिम्स, जलतरण तलाव व बॅडमिंटन सारख्या इनडोअर गेम्सवर ही अद्याप निर्बंध आहेत.

मात्र, या निर्बंधांचे उल्लंघन करत मागील काही दिवसांपासून जिम्स, बँडमिंटन हॉल सुरू अलल्याचे निदर्शनास येत आहे. क्रीडा आयुक्तालायकडे यासंदर्भातील तक्रारी आल्या आहेत. क्रीडा आयुक्तांनी छायाचित्रांसह या तक्रारी महापालिकेकडे पाठवल्या आहेत.
यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून जिम्स आणि बॅडमिंटन हॉल सुरू असल्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील जिम्स, इनडोअर गेम्स हॉल, जलतरण तलाव यांची नियमित पाहणी करून सुरू असलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.