मुंबई, पुणे आणि कोकणासाठी आगामी 3 दिवस धोक्याचे, अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊस पुडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे परिसराला आज (मंगळवार) पावसाने अशरश: झोडपून काढलं. या पावसाचा जोर पुढील दिवस कायम राहणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.

कश्यपी यांनी पुढे सांगितले की, येत्या पंधरा दिवसांमध्ये कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात चांगला पाऊस पडेल. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यातील धरणसाठ्यातही नक्की समाधानकारक वाढ होईल. राज्यात सध्या मुंबईसह घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहिल. यानंतर थोडीशी उघडीप होऊन 9 ऑगस्टला राज्यात पावसाचा आणखी जोर वाढेल असे कश्यपी यांनी सांगितले.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा पाऊस परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

गेल्या 24 तासापून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांताक्रुझ भागात नाल्याला लागून असलेली दोन घरं कोसळी आहे. यामध्ये 1 महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या. यापैकी एका मुलीला वाचवण्यात येश आले आहे. तर जान्हवी काकडे या दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे.