‘पोलीसनामा’ इम्पॅक्ट : केडगावमध्ये तहसीलदारांनी धाड टाकून मोठा वाळू साठा आणि ट्रक पकडला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी या शिर्षकाखाली पोलीसनामाने वाळू चोरी बाबत दिलेल्या वृत्तानंतर तीन तासांमध्येच दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी स्वतः पथक घेऊन धाडसी धाडी  टाकत केडगाव परिसरातील देशमुख मळा या ठिकाणी वाळूचा मोठा साठा आणि वाळू चोरी करणारे ट्रक पकडले आहेत.

ही कारवाई  आज शुक्रवारी रात्री १० वाजता करण्यात आली असून वाळूच्या साठ्याचा पंचनामा करण्यात आला आहे तर वाळू चोरी करत असताना पकडलेले ट्रक हे एस आर पी एफ ग्राउंड येथे लावण्यात आले आहे.

तहसीलदारांनी स्वतः रात्रीच्यावेळी येऊन टाकलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे, तर वाळू माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत. वाळू माफियांची हयगय केली जाणार नाही कुठेही वाळू चोरीचा प्रकार केला जात असेल तर तेथे कारवाई करून वाळू चोरांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिला आहे.