पुणे : नाट्य मंदिराचा पडदा लवकर उघडावा यासाठी कलाकारांनी घातले नटराजाकडे साकडे

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – बालगंधर्व रंगमंदिर सोहळा नेहमी सालाबादप्रमाणे 26 जून रोजी दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येणारा बालगंधर्व रंगमंदिराचा 53 वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला.कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ,उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, अध्यक्ष मेघराज राजे भोसले ,लक्ष्मीकांत खाबिया व परिवारातील मोजकेच पदाधिकारी व सदस्य एकत्र येऊन 53 वा वर्धापनदिन प्रतिमेस पुष्प अर्पण करून व केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न झाला .

यावेळी बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पुजन करण्यात आले.तिथे रीतसर नारळ फोडण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले.हा पडदा लवकरच उघडावा यासाठी सर्वांनी नाटराजकडे साकडे घातले.तसेच सर्व कलाकारांनी नेहमी प्रमाणे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिन निमित्ताने केक कापून साजरा केला तसेच यावेळी महापौरांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल या साठी प्रयत्न करू असे आश्वासन सर्वांना दिले.अतिशय चांगल्या आनंददायी वातावरणात हा वर्धापन दिन सोहळा आज सर्व कलाकारांनी साजरा केला.

या प्रसंगी सोहळ्याच्या आठवणींना उजाळा देताना मेघराज राजेभोसले म्हणाले,बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन बालगंधर्व परिवारातर्फे 14 वर्षे साजरा केला जातो.तसेच हा सोहळा 3 दिवस साजरा होतो.पुण्यातील सर्व कला प्रेमींसाठी एक पर्वणी असते यात भावगीत ,भक्तीगीतापासून लावणी पर्यंत सर्व कला आविष्कार साजरे केले जातात.पुणेकरासाठी मोफत असलेला कार्यक्रम गेली 14 वर्षे साजरा केला जातो.अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहेत.सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू असतात.सकाळी जादूचे प्रयोग ,भावगीत,भक्तीगीत, लोकधारा, एकपात्री प्रयोग ,महिलांसाठी लावणी ,संगीत रजनी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती ,सिनेसृष्टीतील अनेक गाजलेले कलावंत या मोहोत्सवात आतापार्यंत सहभागी झालेले आहेत.या मोहोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांचा मेळावा पाहायला मिळायचा तसेच सर्व कलाकारांच्या अडचणी असतील किंवा एकमेकांची विचारपूस करण्यासाठी 3 दिवस एकत्र असायचे.सकाळपासून संध्याकाळ पर्यन्त एकत्रित पणे एखाद्या रंगमंदिराचा अशा प्रकारे वर्धापनदिन साजरा करणारे एकमेव पुणे शहर व बालगंधर्व रंगमंदिर असेल.