Pune : वारजे माळवाडीतील रामनगरमध्ये सराईत गुंडांकडून भरदुपारी तरूणावर कोयत्याने सपासप वार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारजे माळवाडी येथील रामनगर भागात सराईत गुंडांनी भरदुपारी दहशत माजवत रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला अडवून बेदम मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी परशुराम तात्या गायकवाड (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सराईत गुंड दादा मिसाळ, शेखर खवळे, यांच्यासह बाळ्या येनपुरे, सचिन हिरेमनी यांच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान चौकात हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी हनुमान चौकात त्यांना आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले. तसेच त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून खून करण्याचाही प्रयत्न केला. भरदुपारी हा प्रकार घडल्याने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. सोडवण्यास येत असणाऱ्या नागरिकांना देखील या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवला. तर परिसरात तुफान गोंधळ घालत दहशत निर्माण केली. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.