शहरातील घरफोड्याचा धुमाकूळ सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्याचा धुमाकूळ सुरूच असून, चोरट्यांनी मार्केटयार्ड येथील एक लॅपटॉपचे दुकान फोडून तबल साडे बारा लाखांचा ऐवज चोरला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णूकांत लढ्ढा (वय ३७ रा. गंगाधाम, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर रवीराज ट्रुमॉल आहे.

या इमारतीत लढ्ढा यांचे दुकान तसेच कार्यालय आहे. शहरातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच खासगी कार्यालयांना लढ्ढा लॅपटॉपची विक्री करतात. गेल्या दोन महिन्यांपासून लढ्ढा यांचे दुकान बंद आहे. शनिवारी (२४ मे) लढ्ढा सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकानात आले. दुकानाची पाहणी केली असता दरवाजा उघडा असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर दुकानात जाऊन त्यांनी पाहणी केली असता तेथे ठेवण्यात आलेले दहा लॅपटॉप चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. इमारतीत व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहण्यात येत आहे. त्यानुसार चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या 10 लॅपटॉपची किंमत 12 लाख 43 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गौतम खरात करत आहेत.