Pune : तारादूतांचे ‘सारथी’ कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

पुणे : तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कार्यालयासमोर आजपासून तारादूतांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

महिला सक्षमीकरणासह सामाजिक जाणीव-जागृती उपक्रम राबविण्यासाठी सारथी संस्थेने तारादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. त्यासाठी ४९० तरुण-तरुणींची तारादूतपदी निवड करून, त्यांना अठरा हजार रुपयांचे मानधनही निश्चित करण्यात आले. मात्र, नियुक्त्या व मानधन रखडल्याने तारादूतांनी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात सारथीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते.

त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प सुरू राहील, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र, सारथीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी ६ मार्च रोजी तारादूत प्रकल्पाला स्थगिती दिली, तसेच २७ मार्च रोजी तारादूतांना नोंदणीकृत बंधपत्र व सारथीचे ओळखपत्र जमा करण्याच्या सूचना देत तुमच्या सेवा समाप्त करण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रकल्प सुरू न झाल्याने उद्विग्न झालेल्या तारादूतांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.