Pune : उद्यानातील वॉचमनमुळे उंच आकाशी उडणार्‍या जखमी घारीला मिळाले जीवदान

पुणे : घार उडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी अशी म्हणं आपण वारंवार वापरत असतो. मात्र, आज घार उंच झाडावर मरणयातना भोगताना पाहिले आणि मानवी हृदयाला पाझर फुटला. उद्यानातील सुरक्षारक्षकाने तातडीने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून क्षेत्रीय कार्यालयातून इलेक्ट्रिक दिवे दुरुस्त करण्याची गाडी मागविली. घारीला खाली घेऊन तिच्या पायातील मांजा काढला. पायाच्या जखमेवर उपचार केले, पाणी पाजून खाऊ घातले. दुपारी तीनच्या सुमारास घारीने पुन्हा आकाशी भरारी घेतल्याचे सुरक्षारक्षक पंढरीनाथ शिंदे यांनी सांगितले.

हडपसर (मगरपट्टा चौक)मधील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानामध्ये आज (सोमवार, दि. 19 एप्रिल) सकाळी शिंदे देखरेख करीत होते. त्यावेळी त्यांना कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून कावळ्याच्या आवाजाच्या दिशने उद्यानातील सुरक्षारक्षक पंढरीनाथ शिंदे आणि उद्यानासमोरील वडापाववाले रामचंद्र पवार यांनी धाव घेतली. उंच आकाशी उडणारी घार दिसली. त्यावेळी तिच्या पायाला मांजा अडकला होता, त्यामुळे पायाला जखम झाली होती. त्याचवेळी कावळ्यांनी तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मानवी चाहुल लागताच कावळ्यांनी पळ काढला. मात्र, उंचावरून घारीला खाली कसे घ्यायचे असा प्रश्न पडला. त्यामुळे त्यांनी वीज वितरण कंपनीला पाळण्याची गाडी पाठविण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे चालक नव्हता. दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातून गाडी आली आणि घारीला सुस्थितीत खाली घेतले. घारीच्या पायाला जखम झाली होती, तिच्यावर उपचार केले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास घारीने पुन्हा आकाशात भरारी घेतली, असे शिंदे यांनी सांगितले.