Pune : पुराव्यांची साखळी पुर्ण होत नसल्याने खूनाच्या गुन्ह्यात ‘यशवंत’ची निर्दोष मुक्तता

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  खून प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण होत नसल्याने एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा निकाल दिला. यशवंत पवार ऊर्फ यशवंत वाघमारे असे निर्दोष मुक्त करण्यात आलेल्याचे नाव आहे. विजयकुमार वंगलवर (रा. मुंबई) यांचा खून केल्याचा आरोप वाघमारेवर करण्यात आला होता.

एक डिसेंबर २०१५ रोजी लोणावळा परिसरात ही घटना घडली. वंगलवर यांची हत्या करून त्यांचा मोबाईल व रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात यशवंत वाघमारे याने मोबाईल व रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने वंगलवर यांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल संतोष बापु पवार याला विकल्याचे निष्पन्न झाले होते. सदरच्या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण १० साक्षीदार तपासले. परंतु मोबाईल मयताचा असल्याबत कोणताही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर नसल्याने तसेच मोबाईलचे सीडीआर व एसडीआर. पोलिसांनी दाखल न केल्याने सदर खटल्यात परिस्तितीजन्य पुराव्याची पूर्ण साखळी जोडण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे वाघमारे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फ अ‍ॅड. मयुर दोडके यांनी काम पाहिले.