Pune : ‘नंदलाल’च्या जागी ‘मंदलाल’ करुन बाणेरमधील 5 गुंठे जागा परस्पर विकली; बनावट खरेदीखत करणार्‍याचा पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राजेश नंदलाल जोशी असे जमीन मालकाचे नाव असताना त्याच्या वडिलांच्या नावामध्ये मंदलाल जोशी असा बदल केला. त्या नावाने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करुन त्याआधारे बाणेर येथील ५ गुंठे मोकळ्या जागेची बनावट खरेदी खताद्वारे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दिलीप बळीराम पवार (वय ४९, रा. लोहगाव) याला अटक केली आहे. तसेच संतोष देशमाने, डी. एन. देशमाने, नवनाथ पत्की, अब्दुल रहमान रामचंद्र दुर्राणी, नजीम शेखलाल शेख (रा. नागपूर चाळ, येरवडा) आणि राजेश मंदलाल जोशी असे नाव धारण करणारी व्यक्ती व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेश नंदलाल जोशी (वय ६२, रा. हडाणुकर कॉलनी, कोथरुड) या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. जोशी यांची बाणेर येथील सं. नं. ५२/५/२ /८ येथे ४९४ चौरस मीटर जागा आहे. ती त्यांच्या ताब्यात असताना दिलीप पवार व इतरांनी संगनमत करुन राजेश यांच्या वडिलांच्या नावात बदल करुन नंदलाल ऐवजी मंदलाल जोशी नावाने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनविले. राजेश जोशी यांच्या जागेची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी विसार पावती, खरेदी खत इत्यादी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यांच्या नावाने बनावट व्यक्ती समोर उभी करुन त्या आधारे ती जागा दुसर्‍याला विकून फिर्यादी तसेच सरकारची फसवणूक केली.