‘कोरोना’चा संसर्ग वाढू लागल्याने पुणे मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर, केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा : आ. सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना साथीचा संसर्ग पुण्यात वाढतच असून शहरातील वैद्यकीय सेवा ढासळली आहे. पुणे मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून राज्य सरकारला अपयश आले असल्याने आता केंद्र सरकारने यात वेळीच हस्तक्षेप करुन पुण्यात वैद्यकीय सुविधा उभ्या कराव्यात अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. या मागणीबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमदार शिरोळे यांनी आज ( गुरुवारी) पाठविले आहे.

वैद्यकीय सुविधा देण्यात हेळसांड झाल्याने शास्त्रज्ञ डॉ.पी. लक्ष्मी नरसिंहन यांचा मृत्यू झाला. त्याही पूर्वी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने रुग्णांचे हकनाक मृत्यू झाले आहेत याबद्दल आमदार शिरोळे यांनी चिंता व्यक्त केली आणि केंद्र सरकारला यात लक्ष घालण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे आणि पुण्यातील वैद्यकीय सुविधा कोलमडल्यातच जमा असून त्या नवीन रुग्णांचा ताण सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहेत. वैद्यकीय यंत्रणेचा अभाव असल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या पुण्यात दोनशे आयसीयू बेड्स आणि शंभर व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता आहे. वाढत्या संसर्गाला तोंड देण्यास राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे असे शिरोळे म्हणाले.

या ही स्थितीत राज्य सरकार वैद्यकीय सज्जतेबद्दल नागरिकांची दिशाभूलच करत आहे. देशभरातील कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू याचा पुण्यामध्ये वाढता आलेख आहे. दहा हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करता येतील अशी यंत्रणा शासनाला अद्यापपर्यंत उभी करता आलेली नाही. शासनाच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्याने येथील प्रशासन खाजगी रुग्णालयांवर भर देऊन संकटकाळात मार्ग काढू पहात आहे. कोरोनाव्यतिरिक्त जे गंभीर आजार आहेत, त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्याकडे तर साफ दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस ती समस्याही उग्र रुप धारण करत आहे.

शहरात पहिला लॉकडाऊन सुरु झाला त्यावेळीच रुग्णांची संख्या वाढेल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तसेच विविध सर्वेक्षणातून निदर्शनास आणून देण्यात आले होते. परंतु शंभर दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात त्यादृष्टीने यंत्रणा उभी करण्यात राज्य सरकारच्या नेतृत्वाला अपयश आले.

राज्य सरकारच्या अपयशापायी पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन शहरात लागू केला आहे. त्याचा आज तिसरा दिवस आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत वैद्यकीय सुधारणा अपेक्षित होत्या. कोरोना संकटकाळात नेतृत्त्वाचा अभाव जाणवतो आहे. कोरोनाचे संकट वाढत असतानाही गेल्या शंभर दिवसात मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याला एकदाही भेट दिलेली नाही, प्रशासनाकडून वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेतलेला नाही, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पुणेकरांंना प्रोत्साहनही दिलेले नाही, लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना फोन करुन माहिती घेतलेली नाही, माझ्या ई-मेल्सनाही उत्तर दिलेले नाही.

पुणं मोठ्या आपत्तीच्या काठावर येऊन ठेपलेले आहे. विविध स्तरावर राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. लोकांमध्ये सरकारविषयी वैफल्य आले आहे. अशा बिकटप्रसंगी केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन जास्तीतजास्त वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सुरु करण्यासाठी सहाय्य करावे अशी मागणी आमदार शिरोळे यांनी पत्रात केली आहे.