पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसलाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसलाच सोडण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने निश्‍चित केले आहे. कॉंग्रेस जो उमेदवार देईल, त्याला आमचा पाठींबा राहील आणि त्याला निवडुण आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज येथे जाहीर केले. विशेष असे की मागील काही महिन्यांपासून भाजपपासून दुरावलेले आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसकडून इच्छुक असलेले राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांच्या उपस्थितीतच पवार यांनी ही घोषणा केल्याने आगामी लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून काकडे हे आघाडीचे उमेदवार असतील याची शक्यता वाढली आहे.

जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या अजित पवार यांची आज दुपारी खासदार संजय काकडे यांनी भेट घेतली. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळवून देण्यामध्ये महत्वाची भुमिका पार पाडणारे काकडे काही महिन्यांपासून भाजपपासून दूर गेले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या काकडे यांनी सुरवातीला भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी कंबर कसली होती. परंतू तूर्तास हे दृष्टीपथात नसल्याने त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी सुरू केल्या आहेत. डिसेंबरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांनी अनेक स्थानीक नेते आणि नगरसेवकांसोबतच भेटीगाठीचा सिलसिला सुरू ठेवला होता. दरम्यान, अगदी कालपरवापर्यंत आघाडीमध्ये पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढविणार असे सातत्याने सांगणारे अजित पवार यांची भुमिका महत्वाची होती.

अजित पवार पुण्यात असल्याची संधी साधत काकडे यांनी आज दुपारी त्यांची भेट घेतली. अर्धा तास दोघांची जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात एकांतात बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये ४८ पैकी ४४ जागांचे वाटप पुर्ण झाले आहे. काही जागा मित्र पक्षांनाही सोडायच्या आहेत. पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे असावी, अशी आमची भुमिका होती. परंतू शरद पवार यांनी जिल्ह्यातील साडेतीन मतदारसंघांपैकी अडीच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असताना पुण्याची जागा मित्रपक्ष कॉंग्रेसला सोडावी लागेल, अशी भुमिका मांडली आहे. कॉंग्रेस जो उमेदवार देईल त्याला निवडूण आणण्यासाठी आम्ही निश्‍चित प्रयत्न करू याप्रसंगी संजय काकडेही तेथे उपस्थित होते.

पुणे भाजप अनस्टेबल – संजय काकडे
मी भारतीय जनता पार्टी पुणे महापालिकेत सत्ता यावी यासाठी विशेष मेहनत घेतली. परंतू नव्याने निवडूण आलेल्या नगरसेवकांना भाजपने न्याय दिला नाही. काही आमदारही माझ्यामुळे पक्षात आले, परंतू त्यांना संधी दिली नाही. सत्तेसाठी माझा आणि माझ्या सहकार्‍यांचा वापर करून घेतला आहे, अशी माझी भावना झाली आहे. लोकसभा निवडणुक भाजपकडून लढविण्यासाठी मी इच्छा व्यक्त केल्यानंतर स्थानीक भाजपमधील काही सोंगाड्यांनी त्याला विरोध करायला सुरूवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे संबध नेहमीच चांगले होते आणि राहातीलही परंतू स्थानीक भाजप आणि राज्यातील भाजपनेत्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल माझे मत चांगले राहीलेले नाही. पुण्यातील भाजप अनस्टेबल झाली आहे. त्यामुळे जे साधे नगरपालिकेची निवडणुक लढले नाहीत, अशांचीही नावे पुढे येत आहेत अशी टीकाही काकडे यांनी माध्यमांशी बोलताना केली.