Pune : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे का ?, आयुक्तांनी वस्तुस्थिती मांडावी : मोहन जोशी यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्यानेशहरातील विकास कामे थांबणार का ?या विषयीची वस्तुस्थिती महापालिका प्रशासनाने पुणेकरांसमोर मांडावी, अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणे महापालिकेच्या तिजोरीत फारशी रक्कम नसल्याने विकासकामांचा आग्रह धरू नका असे प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना सांगितले जाते आणि दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करीत आहेत. मिळकतकरातून सवलतीसाठी अभय योजना जाहीर केली आहे. आणखीही उत्पन्नवाढीचे दावे पदाधिकारी करीत आहेत. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील विसंगत माहितीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता महापालिकेच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळणे गरजेचे झाले आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

सत्ताधारी भाजपचे नेते उत्पन्नाचे दावे करून मोठ्या योजना मार्गी लावण्याचे दावे म्हणजे दिशाभूल आहे, असा आरोप जोशी यांनी केला असून भाजपने दिखावूपणा कमी करून साथ नियंत्रण आणि मूलभूत सुविधांवरच खर्च करायला हवा अशी मागणी केली आहे.