Pune : उरुळी कांचनमध्ये लॉकडाऊनचा उडाला ‘फज्जा’ !

पुणे : विकेंडच्या दुसऱ्या टप्प्यात (रविवार, दि. 18 एप्रिल) उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात फज्जा उडाला. दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यवहार सुरू ठेवले होते, त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ सुरू झाली. तसेच एरवी घरामध्ये थांबणारा वर्गसुद्धा रस्त्यावर बिनदिक्कत फिरत असल्याने लॉकडाऊन का म्हणायचे असा सवाल सूज्ञ नागरिकांनी उपस्थित केला.

कोरोनाचा ज्वर वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची ब्रेक द चैनसाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुस्थित राहावे यासाठी विकएन्ड लॉकडाऊन केले. त्यानंतर लगेच 15 ते 30 एप्रिल दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊनच जाहीर केले. मात्र, ग्रामीण भागातील मुख्य बाजार पेठेच्या ठिकाणी नागरिकांकडून नियमांची ऐसीतैशी केली जात आहे. उरुळी परिसरातील दुकानदार अर्ध्या सेटर उघडे ठेवून व्यवहार सुरू ठेवले. रस्त्यावर ठिकठिकाणी फळविक्रेते थांबल्यामुळे खरेदीदारांनी तेथे गर्दी केली होती. तर काही विक्रेत्यांनी ग्राहकांना गोडाऊनमध्ये नेऊन आंबा विक्री केल्याचे दिसून आले.

उरुळी कांचन परिसरात गेल्या दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी 53 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्यानेचे दिसून येत आहे. राज्य शासनानच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासनाने नियमावली घालून दिली आहे. मात्र, तिचे पालन होताना दिसत नसल्याची बाब निश्चितच निषेधार्ह आहे.

अनेक दुकानदार मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत नाहीत. पैशाच्या हव्यासापायी दुकानदार सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करीत आहेत, त्यामुळे शासनाने कडक निर्बंध करून कारवाई करण्याची गरज आहे. विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी दुकानदारांवर कारवाई करण्याची गरज आहे. दुकानाबाहेर गिऱ्हाईकांच्या रांगा लागल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करीत विनामास्कधारकावर कारवाई करण्यात प्रशासन धन्यता मानत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.