Pune : होम आयसोलेशन बंद करून कोरोना रुग्णांचे कोविड सेंटरमध्ये विलगीकरण करणे अनाकलनीय; राज्य शासनाने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन – जगदीश मुळीक

पुणे – राज्यातील महाविकास आघाडी सरकार गोंधळलेले असून पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोना बाधित रूग्णांसाठी होमआयसोलेशन बंद करून कोविड सेंटरमध्येच दाखल करण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याची टीका शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत पुण्यातील रूग्ण संख्या देशात मोठी होती. त्यापैकी मोठ्या संख्येने बाधित असणाऱ्या रूग्णांनी आपआपल्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर मात केली. विलगीकरणाचे सर्व नियम पाळले. परंतु आता सर्वच कोरोना रूग्णांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.

पुन्हा एकदा रूग्ण संख्या वाढल्यास इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्णांना कोविड सेंटरमध्ये सामावून घेणे शक्य होणार नाही. तशा प्रकारची व्यवस्थाही शहरामध्ये उपलब्ध नाही. तेवढ्या मोठ्या प्रमाणात साधन-सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये रूग्णांची हेळसांड होण्याची भीती वाटते. शिवाय कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्यावर रूग्णांचा मानसिक ताण-तणाव आणि कुटुंबियांमध्ये भीती वाढण्याची शक्यता आहे. कोविड सेंटरच्या व्यवस्थापनासाठी शासन कोणतीही आर्थिक मदत करत नाही.

वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करतात. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. असे असल्यास सौम्य लक्षणे असणाऱ्या लहान मुलांची कोरोना सेंटरमध्ये व्यवस्था करणे गैरसोयीचे आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता व्यवस्थापनात मर्यादा येऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने आपला निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र जनआंदोलन केले जाईल.

पुणे शहरात दुसर्‍या टप्प्यामध्ये महापालिकेने सुमारे एकविसशे बेडस क्षमतेचे कोविड केअर सेंटर निर्माण केले होते. एप्रिलमध्ये ऍक्टीव्ह रुग्णसंख्या ५५ हजारांपर्यंत पोहोचली असतानाही या सेंटर्समध्ये जेमतेम अकराशे रुग्ण आले होते. बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्येच होते. शहरातील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या ९ हजारांपर्यंत कमी झाली आहे. शहरात होम आयसोलेशनसाठी सुविधा आहेत. मात्र, ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या अद्याप जास्तच असून तुलनेने होम आयसोलेशनसाठी कमी पर्याय आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पॉझीटीव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यास हरकत नाही. – मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिका.

पुणे शहरात कोरोना बाधितांचे होम आयसोलेशन बंद करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून अद्याप कुठलेही आदेश आलेले नाहीत. राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, पुणे महापालिकेने दुसर्‍या लाटेमध्ये विलगीकरण कक्ष सुरू केलेले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याचेही नियोजन तयार आहे. – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त