Pune : कोरोनाबाधितांवर उपचार करणेच काळाची गरज – मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश राख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीमुळे नागरिक सैरभर झाले आहेत. बेड नाही, ऑक्सिजनचा तुटवडा, व्हेंटिलेटर बेड नाही, रेमडिसिव्हर इंजेक्शन नाही, अशी भयानक अवस्था असल्याने रुग्णांवर उपचार करताना कसरत करावी लागत आहे. मुलगी वाचवा अभियानानंतर आता कोरोनाबाधितांवर उपचार करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये 80 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश राख यांनी सांगितले.

हडपसर माळवाडीमधील मेडिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून भाग्यश्री हॉटेलमध्ये 30 बेड आयसोलेशन कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. पुणे शहर शिवसेना उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी पंचतारांकित हॉटेल कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे, असे डॉ. लाला गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश राख, डॉ. विराज सोमवणे, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. स्वप्नील भाडळे उपस्थित होते.

डॉ. राख म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना बेड मिळविता नातेवाईकांची दमछाक होत आहे. त्यामुळे मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये पूर्ण कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, शेजारी असलेल्या भाग्यश्री हॉटेलमध्ये 30 सुरू केले आहेत. सर्व ऑक्सिजन बेड असून, हडपसर परिसरातील नागरिकांना उपचार देण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यासाठी ऑक्सिजन मिळविताना कसरतच करावी लागत आहे. रेमिडिसिव्ह इंजेक्शनचा अद्याप पुरवठा सुरळीत झाला नाही. प्रशासनाने ऑक्सिजन आणि रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा करून दिला, तर उपचार करणे सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. शंतनू जगदाळे यांनी सांगितले की, मागिल महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे शासकीय हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांमध्येही उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे आता पर्यायी व्यवस्था म्हणून उपनगर आणि परिसरामध्ये हॉटेलमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करून उपचार सुरू केले जात आहेत. नागरिकांनी संयम राखून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑक्सिजन सिलिेंडरची मागणी वाढल्यामुळे कंपन्यांनी किमती दुप्पट-तिप्पट केल्या आहेत. ऑक्सिजन सिलिेंडर 300 रुपयांना मिळत होता, तो 900 रुपयांपर्यंत केला आहे. किमती वाढवूनही पुरवठा सुरळीत केला जात नाही. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना प्रचंड ताणतणाव येत आहे. प्रशासनाने तातडीने अशा बेफिकीर कंपन्यांवर कारवाई करून नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. लाला गायकवाड म्हणाले की, मागिल वर्षभरापासून कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीती वाढत आहे. आता नागरिकांना चांगल्या पद्धतीने उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा 24 बाय 7 कार्यरत आहे. मात्र, त्यासाठी ऑक्सिजन, रेमडिसिव्हर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय साहित्याच्या किमती वाढल्याने त्याचा बोजा रुग्णांवर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने वैद्यकीय साहित्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना उपशहरप्रमुख समीर तुपे म्हणाले की, समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून माझी नैतिक जबाबदारी म्हणून माझे हॉटेल कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी दिले आहे. आज शहर-उपनगरांमधील सर्वच हॉस्पिटलमध्ये बेडच्या उपलब्धतेपेक्षा जास्त रुग्ण जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाही, ही बाब प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने नैतिक जबाबदारी म्हणून अशा वेळी मदत करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.