Pune : जे. के. व्हेंचेर्स नावाची बोगस कंपनी स्थापन करून तब्बल दीड कोटीला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जे. के. व्हेंचेर्स नावाची बोगस कंपनी स्थापन करून नफा देण्याचा आमिष दाखवत तब्बल दीड कोटीला गंडा घालण्यात आला आहे. २०१७ ते नोव्हेंबर २०२० मध्ये या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी प्रणय उदय खरे (वय २८, रा. साळुंखे विहार, कोंढवा) याच्यावर
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनीकुमार बळीराम कांबळे (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणयने बोगस जे. के. व्हेंचेर्स नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर त्याने गुंतवणूकदारांना रत्नागिरीत तब्बल ७ हजार एकर जागा घेतल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधित जागेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास पहिल्या ११ गुंतवणूकदारांना १ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार अश्विनीकुमार यांनी २०१७ मध्ये जे. के. व्हेंचेर्स कंपनीत १ कोटी ४५ लाख १७ हजार रुपये गुंतविले. मात्र, प्रणयने त्यांना कोणताही मोबदला न देता फसवणूक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.