Pune : जन अदालत संस्थेचे हेल्प ऑन फोन अभियान; तणावग्रस्त नागरिकांचे समुपदेशन व कायदेशीर ‘आधार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना काळात ताण-तणावाचा सामना करणाऱ्या नागरिकांना मानसिक व कायदेशीर आधार देण्यासाठी ‘जन अदालत’ संस्थेने ‘हेल्प ऑन फोन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत संस्थेचे वकील प्रतिनिधी सकाळी ११ ते ६ या वेळेत तणावग्रस्त महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे समुपदेशन करणार आहेत, तसेच मोफत कायदेशीर सल्लाही देणार आहेत.

कोरोनाचा समाजाच्या सर्व स्तरावर विपरीत परिणाम झाला आहे. महिलांना कौटुंबिक वादाचा सामना करावा लागत आहे, ज्येष्ठाना ज्येष्ठ नागरिकांना एकाकी वाटत असून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर बाहेर खेळता येत नसल्याने लहान मुले संगणक आणि मोबाईलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतले आहेत. या सर्वांना व्यक्त होण्यासाठी ‘हेल्प ऑन फोन’ ही मदतवाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे पुणे शहरातील आठ विभागांमध्ये संस्थेचे २१ वकील प्रतिनिधी आणि पिंपरी-चिंचवड विभागात ९ वकील प्रतिनिधी समुपदेशन करणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, ॲड. नरहर कुलकर्णी, ॲड. राणी सोनवणे, ॲड. पल्लवी विघ्ने, ॲड. सारिका परदेशी यांनी केले आहे. ॲड. स्वाती चौधरी सर्व प्रतिनिधींशी समन्वयक करत आहेत.

समुपदेशनासाठी या नंबरवर करा फोन :

पुणे शहरासाठी – ९६३७३१३२७३

पिंपरी-चिंचवडसाठी – ९५५२७३८२२७