पुण्यात राष्ट्रवादीनं ABVP च्या कार्यालयाला ‘काळं’ फासलं ! (व्हिडिओ )

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयुच्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात पडसाद उमटताना दिसत आहेत. पुण्यातल्या टिळक रोडवरील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यालयाच्या बोर्डला राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याची घटना समोर आली आहे. जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने हे आंदोलन केल्याचं समजत आहे.

एबीव्हीपीच्या बोर्डला काळं फासताना यावेळी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी अनेक घोषणा दिल्या. एबीव्हीपी हाय हाय असे म्हणत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर धडक दिली. दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आक्रमक कार्यकर्त्यांनी यावेळी दगडफेकही केली होती. याशिवाय काल(सोमवार दि 6 जानेवारी) राष्ट्रवादीने मुंबईत भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/