Pune : ‘कोरोना’ची दुसरी लाट थोपवण्यासाठी, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत संयुक्त बैठक !, महापौर, मनपा अधिकार्‍यांनी दिलं स्वंयसेवी संस्था प्रमुखांना ‘हे’ आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या पहिल्या लाटेला थोपवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले आणि त्यामुळेच हे यश सामूहिक आहे. संकटाच्या काळात पुणेकर एक होऊन लढतात हा लौकिक कायम राखला याचा अभिमान वाटतो, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी आणि संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी (दीर्घकालीन) उपाययोजना करण्याबाबत महापौर, स्वयंसेवी संस्था प्रमुख व मनपा अधिकारी यांची संयुक्त बैठक सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस विजय कुंभार (सुराज्य संघर्ष समिती), महेश झगडे (माजी आयुक्त, पुणे महापालिका),
मधुकर चौधरी (माजी मिशन डायरेक्टर एनआरएचएम), संदीप खर्डेकर (अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन), प्रा. मोहन गुप्ते (माजी संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ़ इपिडेमॉलॉजी), किशोरी गद्रे (माजी उपजिल्हाधिकारी), विनिता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार जुगल राठी, सजग नागरिक मंच डॉ. सचिन नगरकर यांच्यासह मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख आशिष भारती, उपआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, उपायुक्त सुनील इंदलकर आदी उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्थांच्या सूचनांचा निश्चितच विचार करू व अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय पथकाच्या सूचनेनुसार दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

माजी आयुक्त महेश झगडे यांनी मनपाने कोरोना काळात अतिशय उत्तम काम केल्याचे सांगितले. मात्र, आरोग्य खात्यात ४५ टक्के जागा रिक्त असून, या जागा भरण्यासाठी मनपाने राज्य सरकारकडे तातडीने मागणी करावी, असे आवाहन केले. तसेच या पदांची अर्हता बदलली तर अधिक कर्मचारी उपलब्ध होतील आणि मनपास प्रभावीपणे संसर्गजन्य आजारांवर मात करता येईल. सत्ताधाऱ्यांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते याची खंत वाटते, असेही ते म्हणाले.

किशोरीताई गद्रे यांनी लोकशिक्षणावर भर द्यावा, असे आग्रही प्रतिपादन करताना नागरिक जणू कोरोना संपला अशा पद्धतीने वावरत आहेत आणि तिथेच सगळी गफलत होत आहे असे म्हणाल्या. तसेच मोठ्या प्रमाणावर जाहिराती कराव्यात आणि तुमच्यामुळे दुसऱ्याला कोरोना होऊ शकतो हे नागरिकांच्या गळी उतरवावे असे त्यांनी सांगितले.

डॉ. मोहन गुप्ते यांनी सिरम इन्स्टिट्यूट पुण्यात असल्याने ते पुणेकरांचेही देणे लागतात, त्यांनी पहिले पुणेकरांना लस द्यावी, यासाठी महापौरांनी त्यांच्याशी चर्चा करावी असे सांगितले. तसेच सामूहिक प्रतिकारशक्ती ही भ्रामक संकल्पना असल्याने लोकांना शिक्षित करण्याची गरज आहे व बेसिक सुरक्षितता बाळगण्यासाठी लोकशिक्षण मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले.

मधुकरराव चौधरी यांनी सर्वेक्षण यंत्रणा सक्षम करावी आणि आशा सेविकांमध्ये वाढ करतानाच कॉन्ट्रॅक्टवरील डॉक्टरांच्या संख्येत वाढ करावी असे सुचवले. तसेच एफडीए (अन्न व औषध प्रशासन विभागाशी) शी समन्वय साधून रेमडेसिव्हिर इंजेक्शन, मास्क, सॅनिटायझर यांच्या दर्जाची वारंवार तपासणी करावी अशी सूचना केली.

विनिता देशमुख यांनी मनपाचा डॅशबोर्ड सुलभ करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला, तर जुगल राठी यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम व इतर उपाययोजना करण्यात याव्यात असे सुचवले.

विजय कुंभार यांनी आरोग्य खात्यातील विसंवादावर बोट ठेवताना निदान अशा युद्धजन्य परिस्थितीत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय व संपर्क ठेवून काम करावे असे सांगितले. तसेच विनामास्क फिरताना जेव्हा दंड आकारतात तेव्हा दंडाच्या पावतीसोबत मास्कही द्यावा अशी सूचना केली तसेच महापौरांनी सर्व दुकानदारांना सार्वजनिक ठिकाणी हॅंड सॅनिटायझर स्टॅंड बसविण्याचे आवाहन करावे आणि ज्याप्रमाणे सार्वजनिक पाणपोई किंवा पीकदाणी / थुंकदाणी असते तसेच यांचे स्वरूप असावे व त्यातील रिफिलिंगची जबाबदारी त्या भागातील दुकानदारांनी स्वीकारावी, यासाठी महपौरांनी पुढाकार घ्यावा असे सुचवले.

भाजपचे पुणे शहर मुख्य प्रवक्ता व क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करताना त्यांनी महापौर पदाची वर्षपूर्ती पूर्ण केली असून, सुसंवादातून प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. तसेच विविध प्रश्नांवर भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सकारात्मक असून, यापुढे वारंवार अशा बैठकांच्या माध्यमातून शहराचा अधिक विकास साधण्याचा प्रयत्न करणार आल्याचे सांगितले.

अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी मनपाची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगतानाच ही लाट येऊच नये, यासाठी उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले.