Pune : न्यायाधीशांनी लाच घेतल्याचे प्रकरण : शुभावरी गायकवाडच्या साथीदाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निकाल बाजूने लावण्यासाठी एका महिलेच्या माध्यमातून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अजय गोपीनाथन असे या आरोपीचे नाव असून तो या गुन्ह्यात अटक शुभावरी गाडकवाडच्या ओळखीचा आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आरोपीची आठ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांची जामीनावर सुटका झाली आहे. न्यायदंडाधिकारी जतकर या मध्यस्ती महिलेला त्यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या बाबतच्या दाव्यांची माहिती देत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. लाच स्वीकारणारी महिला शुभावरी भालचंद्र (व २९, रा. मावळ), सुशांत बबन केंजळे (वय ३५, रा. रावेत) आणि बडतर्फ पोलिस निरीक्षक भानुदास ऊर्फ अनिल जाधव (रा. मुंबई ) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर अजय गोपीनाथन याचा पोलिस शोध घेत होते.

शुभावरी आणि अजय यांची गेल्या दिड वर्षांपासून ओळख आहे. त्यांच्यात आत्तापर्यंत अनेकदा संपर्क झाला आहे. ज्या दिवशी शुभावरी हिला अटक झाली त्या दिवशी तिने तिचा जूना मोबाईल अजयकडे दिला होता. याबाबत चौकशी केला असतो तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे, असे सरकार पक्षातर्फे विलास घोगरे पाटील यांनी न्यायालयास सांगितेल. अजयच्या आवाजाचा नमूना घेत पुढील तपासासाठी तसेच पुढील तपाससाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी ॲड. घोगरे-पाटील यांनी केली.