पुण्यातील ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानामुळे चौघांना ‘जीवदान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक ३२ वर्षीय व्यक्ती पुण्यातील केईएम रूग्णालयात उपचार घेत असताना ब्रेनडेड झाली. त्याच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने अवयवदान करण्यात आले. या अवयवदानामुळे चार रूग्णांना जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती वाढदिवशीच म्हणजेच ७ जूनला ब्रेनडेड झाली. या जगाचा निरोप घेतल्यानंतरही त्यांनी जाताना चार जणांना वाढदिवसानिमित्त जीवनदानाचे गिफ्ट दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ३२ वर्षांच्या एका व्यक्तीस हार्ट स्ट्रोक आल्यानंतर त्यांना पुण्याच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना वाचवण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. शेवटी ७ जून, २०१९ रोजी या व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केले. या घटनेनंतर डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या पत्नीचे अवयवदानासाठी समुपदेशन केल्यानंतर तिने अवयवदानाला होकार दिला. मृत व्यक्तीला ६ वर्षांचा मुलगा असून पत्नी ६ महिन्यांच्या गरोदर आहेत. या ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय, यकृत आणि दोन्ही किडनी दान करण्यात आल्या. या अवयवदानामुळे ४ जणांना जीवनदान मिळाले आहे.

यकृत केईएम रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आले आहे. एक किडनी रुबी हॉल क्लिनिकला तर दुसरी किडनी ससून रुग्णालयाला देण्यात आली. हृदय नागपूरला पाठवण्यात आले असून नागपुरात प्रथमच हृदय प्रत्यारोपण झाले आहे. नागपूरच्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. याबाबत माहिती देताना पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीच्या समन्वयिका आरती गोखले यांनी सांगितले की, ऑगस्ट २०१५ मध्ये पुण्यात पहिले हृदय प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर आता नागपुरात पहिले हृदय प्रत्यारोपण झाले आहे. लोकं पुढे येऊन अवयव दान करत आहेत. यामुळे अनेकांचा जीव वाचत आहे. याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे.