लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून करून तेलंगणातून पुण्यात आलेल्यास अटक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून करून तेलंगणातून पुण्यात आलेल्यास खडक पोलिसांनी सापळा रचून पकडले. पुणे पोलिसांनी त्याची पूर्ण खात्रीकरून त्याला तेलंगणा पोलिसांकडे दिले. अफजल अमीर पाशा (वय २७, रा. धर्माबाग, नांदेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील एका महिलेसोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्या महिलेने लग्नासाठी नकार दिला. या रागातून अफजल याने तिचा गळा आवळून जानेवारी २०२० मध्ये खून केला होता. त्यानंतर अफजल पसार झाला होता. तो पुण्यात येऊन राहत होता. यानंतर तो सुरवातीला मिळेल ते काम करीत होता. त्यानंतर रविवार पेठेत एका बांधकाम साईटवर तो काम करत होता. त्याला मराठी चांगली येत होती. त्यामुळे काहीच अडचण नव्हती. तेलंगणा पोलिस त्याचा शोध घेत असताना अफजल रविवार पेठेत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी खडक पोलिसांना सांगितले.

यावेळी याची माहिती काढली जात असताना पोलीस कर्मचारी समीर माळवदकर यांना अफजल याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक सुशील बोबडे, उमाजी राठोड, पोलिस कर्मचारी राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदीप कांबळे, योगेश जाधव यांच्या पथकाने सापळा रचून पकडले. रविवार पेठ हा गर्दीचा परिसर असल्याने त्याचा शोध घेणे कठीण होते. त्यामुळे रविवार पेठेत दोन ते अडीच तास फिरून फोटो दाखवत त्याचा शोध घेत होते. शेवटी तो एका बांधकाम साईटवर राहत असल्याचे समजल्यानंतर त्याला पकडले.