Pune : निवृत्त पोलिसावर कोयत्याने वार करून मोबाईल हिसकाविणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करुन मोबाईल हिसकाविणाऱ्या सराईतासह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी व मोबाईल मिळून ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अश्पाक महमंद शेख (वय २९, रा. अशोकनगर, येरवडा) आणि सुशील मुकुंद निकम (वय २६, रा. गणेशनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश जयकुमार बुरले (वय ५८, रा. स्वारगेट पोलीस लाईन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हे सेवानिवृत्त फौजदार आहेत. ते पुणे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. २५ ऑगस्टला ते शिवाजी रस्त्यावरुन घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी प्रकाश यांच्यावर कोयत्याने वार करुन मोबाईल हिसकावून नेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना हल्ल्यातील सराईत आरोपी अश्पाक शेख असल्याची माहिती पोलीस कर्मचारी समीर माळवदकर आणि बंटी कांबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अश्पाक आणि सुशीलला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक निरीक्षक सुशील बोबडे, उमाजी राठोड, कर्मचारी अजीज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, रवी लोखंडे, योगेश जाधव, इम्रान नदाफ यांच्या पथकाने ही कारवाई केली.