Pune : ‘आम्ही कासेवाडीमधील भाई’ म्हणत हवेत हत्यारे फिरवली; खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत ‘आमच्या नादाला लागला तर कोणालाही जिवंत सोडणार नाही. आम्ही कासेवाडीमधील दादा आहोत’, असे म्हणत हत्यारे फिरवत पसार झालेल्या चौघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.

जिलानी सलीम शेख (वय २९), मुनीर गौश शेख (वय ३३), नझीर समील शेख (वय २७) आणि इरफान आकील पटेल (वय २७, सर्व रा. भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत योगेश मारुती गायकवाड (वय २५, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. २२ मे रोजी भवानी पेठेतील विशाल तरुण मंडळासमोर हा प्रकार घडला.

फिर्यादी आणि आरोपी एकाच वस्तीत रहायला आहे. शनिवारी फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह घटनास्थळी थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिक तेथे जमा झाले होते. त्यांच्याकडे पाहून आरोपी म्हणाले, ‘आमच्या नादाला लागला तर कोणालाही जिवंत सोडणार नाही. आम्ही कासेवाडीतील दादा आहोत.’

आरोपींपैकी, जिलानी शेख, मुनीर शेख आणि नझीर शेख यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ॲड. ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केले. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपास खडक पोलिस ठाण्याचे विक्रम मिसाळ पाहत आहे.