आर्थिंक व्यावहारातून अपहरण करुन मारहाण, वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन – आर्थिंक व्यवहाराच्या वाद विवादातून एकाचे अपहरण करुन मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु, पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीलाच नाहक त्रास दिला. वरिष्ठांकडे हे प्रकरण गेल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याची दखल घेतली.

प्रकाश आत्माराम पाडावे, संतोष गणपत धोपटे, विमला परमार, जयेश पाडावे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रीती दीपक पांचाळ (वय 33, रा. शनीनगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रीती यांचे पती दीपक तसेच प्रकाश, सचिन आणि संतोष यांनी 2018 मध्ये डीएसपी इंटरप्रायझेस नावाची भागीदारीत कंपनी सुरु केली होती. सर्वजण कमीशन बेसवर विविध कामकाज करीत होते. विमला परमार त्यांची फायनान्सर होती. काही दिवसांपुर्वी त्यांच्यात आर्थिंक वाद झाला. कंपनी भागीदारांच्या म्हणण्यानुसार दीपक यांच्याकडून सव्वा कोटी रूपये येणे बाकी होते. त्यानुसार विमला, संतोष, जयेश यांनी 3 फेब्रुवारीला जांभुळवाडी रस्त्यावर मोटारीत बसवून दीपकचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी दीपकला मारहाण करीत शिवीगाळ केली.

दरम्यान, दिपक यांची पत्नी प्रीती यांनी याबाबत तत्काळ भारती विद्यापीठ पोलीस व नियंत्रण कक्षाला फोन लावला. मात्र, त्यांच्या मदतीस कोणीही आले नाही. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतरही त्यांना मदत मिळाली नाही. उलट त्यांनाच पोलिसांकडून नाहक त्रास देण्यात आला.

यामुळे प्रीती पांचाळ यांनी शिवसेनेच्या युवती सेना पुणे जिल्हा समन्वयक मनिषा धारणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा पोलीस उपायुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकार्‍यांशी पाठपुरावा केला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे मनिषा धारणे यांनी सांगितले. पोलिसांचा आलेल्या अनुभवाबद्दल आपण लेखी गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पोलिसांनामाला बोलताना सांगितले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करीत आहेत.