खळबळजनक ! पुण्यात 16 वर्षीय मुलाला नग्न करून कोयता, बेल्टनं मारहाण, नंतर तोंडावर केलं ‘मूत्रविसर्जन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हडपसर परिसरातील एका 16 वर्षीय मुलाला पाच जणांच्या टोळक्याने नग्न करून कोयता आणि बेल्टने मारहाण केली. टोळके एवढ्यावरच थांबले नाही तर मुलगा बेशुद्ध पडल्यावर त्याच्या तोंडावर मूत्रविसर्जन केली. ही धक्कादायक घटना मांजरी परिसरात गुरुवारी (दि.12) रोजी घडला असून मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी विनीत सूर्यकांत बिरादार (वय-19 रा. भेकराईनगर), शुभम राजाभाऊ जादव (रा. 19 रा. समर्थ नगर, पिंपरी चिंचवड), देविदास उर्फ देवा घनशाम पाहणे (वय-21 रा. काळेपडळ, हडपसर), भरत विशाल राठोड (वय-21 रा. कुंजीर वस्ती), सलीम कलिंदर शेख (वय-22 रा. घुले वस्ती, मांजरी) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत मारहाण झालेल्या मुलाच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत गोपाळपट्टी परिसरात राहतो. 12 मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरच्यांना सांगून तो बाहेर गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्यामुळे त्याच्या घरच्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे हडपसर बीट मार्शलला एक मुलगा बेशुद्धवस्थेत मांजरी रेल्वे ट्रॅकजवळ मिळून आला होता. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, मारहाण झालेल्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो पोलिसांना मिळाला होता. यावेळी पोलिसांनी मुलाच्या घरच्यांना बोलावून व्हिडिओ दाखवला तेव्हा तो मुलगा त्यांचाच असल्याचे महिलेने सांगितले. घरच्यांनी ससून रुग्णालायात जाऊन पाहिले असता बेशुद्ध मुलगा हा त्यांचा मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.