पुणे -कोल्हापूर पॅसेंजर रेल्वेचे इंजिन घसरले

वाठार (सातारा) : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या पॅसेंजर वाठार रेल्वे स्थानकावरुन साताराकडे जात असताना रेल्वेचे इंजिन रुळावरुन घसरले. सुदैवाने रेल्वेचा वेग  कमी असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, इंजिन रुळ सोडून दोनशे मिटर पुढे गेले तर डबे रुळावरच राहिले. या अपघातमुळे एक्सप्रेस गाड्या सातारा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या.
पुणे येथुन दुपारी कोल्हापूरकडे जाणारी पॅसेंजर गाडी नंबर ५१४०९ ही दुपारी तीनच्या सुमारास वाठार रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रेल्वेचे इंजिन रुळावरुन घसरले. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघात घडला त्यावेळी गाडीमध्ये दीड हजाराच्यावर प्रवाशी प्रवास करीत होते. हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच्या पाठिमागील बाजूस खोल दरी व पूल आहे. सुदैवाने गाडी दरी आणि पूल ओलांडून पुढे आली होती. जर पुलावर अथवा पुलाच्या आसपास ही घटना घडली असली तर मोठी जीवीत हानी झाली असती.
सायंकाळी लोणंद बाजूने दुसरे इंजिन आणून प्रवाशी डबे सापले रेल्वे स्टेशनकडे  नेण्यात आले. मिरज जंक्शनवरुन क्रेन आल्यावर इंजिन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे पुण्याहून मिरजकडे जाणाऱ्या व मिरजकडून पुण्याकडे जाणाऱ्या एक्सप्रेस, पॅसेंजर व मालगाड्या लोणंद व सातारा येथे थांबविण्यात आल्या.