Pune : कोंढव्यात ड्रग्जची विक्री ! महिलेला अटक करून 22 किलो गांजा अन् चरस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   घरातून गांजा व चरस या अमली पदार्थाची विक्री करत असलेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 21 किलो गांजा आणि 569 ग्रॅम चरस असा साडे सहा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. कोंढव्यात ही कारवाई करण्यात आली.

समिना मेहमूद शेख (वय 35, रा. नजारा मंजिल, फ्लॅट नं 203, भाग्योदय नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे व अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशा गुन्हेगारांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे.

यादरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक मनोज साळुंखे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येथील भाग्योदय नगरमध्ये राहणारी समीना शेख ही राहत्या घरातून गांजा व चरस या अंमली पदार्थांची विक्री करत आहे” या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पथकाने नजारा मंजिल इमारतीत छापा टाकला. तिला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता घरातून 21 किलो 260 ग्रॅम गांजा आणि 569 ग्रॅम 17 मिली ग्रॅम चरस सापडले. त्याची एकूण किंमत 6 लाख 57 हजार 868 रुपये आहे.

ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस कर्मचारी प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, मारुती पारधी, पांडुरंग पवार, संदीप जाधव, मनोज साळुंखे, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, विशाल दळवी, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.