घरफोडी करणाऱ्याकडून चार गुन्हे उघडकीस, कोंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने घरफोडी करणार्‍या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

करण अंबादास शिंगे (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले सोन्या चांदीचे दागिने, काँम्प्युटर, ग्रँडर, हेअर ड्रायर, देवांच्या मुर्त्या, एल. सी. डी. टी. व्ही, अ‍ॅक्टिवा गाडी, मोटारसायकल असा २ लाख ८३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलीसनामा (Policenama)ला सांगितले की तपास पथकातील पोलीस अंमलदार आदर्श चव्हाण व किशोर वळे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचून शिवनेरीनगर येथून करण शिंगे याला पकडले. त्यांच्याकडून कोंढव्यातील घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणला. त्यातील २ लाख २१ हजार रुपयांचा माल जप्त केला होता. त्यांच्याकडून घरफोडीच्या आणखी एका गुन्ह्यातील टी. व्ही. तसेच दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणराव विधाते, वानवडी विभाग ,कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलिस फौजदार इक्बाल शेख , हवालदार रमेश गरुड, अमित साळुंखे, सुदाम वावरे, संजीव कळंबे, ज्योतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे यांच्या पथकाने केली.