पुण्यातील कोंढवा पोलिसांनी चोरट्यांकडून केल्या 5 रिक्षा हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील विविध ठिकाणाहून चोरलेल्या रिक्षा वेगवेगळ्या गावात नेऊन विकल्या होत्या. अशा ५ रिक्षा व एक रिक्षाचे इंजिन जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २०१८ मध्ये चार टेम्पो रिक्षा चोरीला गेल्या होत्या. त्याचा तपास प्रलंबित होता. हे टेम्पो चोरीचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई ज्योतिबा पवार व पोलीस नाईक अमित साळुंखे यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी शोध घेऊन वसीम अजमल खान (रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपण बाबा ऊर्फ रमजान हसन शेख व अन्सार आयुब खान आणि तौसिफ रफिक शेख यांच्या मदतीने २०१८ मध्ये तीन अ‍ॅपे टेम्पो रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ज्या ठिकाणाहनू रिक्षा चोरी केली होती, ते ठिकाण तसेच इतर ठिकाणे त्याने दाखविली. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यातील २, भारती विद्यापीठ व समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

हे टेम्पो रिक्षा त्याने जळगाव, नशिराबाद, फैजाबाद येथे विकल्याचे सांगितले. पोलीस पथकाने तेथे जाऊन ५ अ‍ॅपे टेम्पो रिक्षा व एका रिक्षाचे इंजिन जप्त केले आहे. तसेच वसीम खान याच्याकडे केलेल्या चौकशीत एका खुनाचा प्रकारही उघडकीस आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५, सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, दादा राजे पवार, सहायक फौजदार, इक्बाल शेख, हवालदार संतोष नाईक व त्यांचे सहकारी निलेश वणवे, अमित साळुंखे, संजीव कळंबे, ज्योतिबा पवार, उमेश शेलार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, उमाकांत स्वामी, कौस्तुभ जाधव या तपास पथकाने केली आहे.