चोरट्याकडून 4 घरफोड्या उघडकीस, 9 लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात कोंढवा पोलिसांना यश

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन – येरवड्यातील चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून ४ घरफोड्या उघडकीस आणून त्यातील ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे.

नाजिम इस्लामउद्दीन अन्सारी (वय ३५, रा. कामराजनगर, येरवडा, मुळ रा.बिजनोर, उत्तर प्रदेश) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नाजिम अन्सारी याने मासुम अन्सारी (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ रा. दिल्ली) याच्या मदतीने कोंढवा व येरवडा परिसरातील जय जवान नगर येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.

कोंढव्यातील घरफोडीमध्ये चोरलेल्या मालापैकी २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ७५ हजार रुपये रोख असा ७ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच जयजवान नगरमधील चोरीतील ९ तोळे वजनाचे १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. अशा प्रकारे ४ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून ९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक बर्गे, सहायक फौजदार इक्बाल शेख, पृथ्वीराज पांडुळे, उमाकांत स्वामी, अजीम शेख, मोहन मिसाळ, कौस्तुभ जाधव, योगेश कुंभार, अमित बधे, रोहित कर्णे या पथकाने केली आहे.