पुण्यातील कोंढव्यात महावीर ज्वेलर्सच्या मालकावर गोळीबार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार दीड वर्षांनी अटकेत

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – येवलेवाडी येथील महावीर ज्वेलर्सच्या दुकान मालकावर भर दिवसा गोळीबार करुन त्यांचा खुन करुन फरार झालेल्या मुख्य सुत्रधाराला तब्बल दीड वर्षांनी कोंढवा पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे. रवी सिंग असे त्याचे नाव आहे. अमृत परीहार यांचे गणेश ज्वेलर्स नावाचे दुकान कोंढव्यात होते. महावीर ज्वेलर्सचे मालक राजस्थानला गेल्याने ते येथील काम पहात होते.

येवलेवाडी येथील महावीर ज्वेलर्स दुकानात परिहार असताना आत शिरुन चार चोरट्यांनी दुकान मालक अमृत परिहार याच्यावर गोळीबार केला. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ते शेवटपर्यंत शुद्धीवर येऊ शकले नव्हते. त्यात त्यांचा मृत्यु झाला होता. दुकानातील सीसीटीव्हीवर हा सर्व थरार कैद झाला होता. त्या आधारे कोंढवा पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्हीद्वारे त्यांचा शोध घेतला. कोंढवा पोलिसांनी त्याच्या ५ साथीदारांना अटक केली होती. मात्र, रवी सिंगचा काही सुगावा लागत नव्हता. तो बिहारमधील हाजीपूर येथे असल्याचे पोलिसांना समजले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या परवानगीने कोंढवा पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले. पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलिस फौजदार इकबाल शेख , कर्मचारी वणवे , संतोष नाईक ,विशाल गवळी , सुरेश भापकर , गणेश आगम,अमित साळुंखे, संजीव कळंबे, जोतिबा पवार, किशोर वळे या पथकाने हाजीपूर येथून रवी सिंग याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.