मद्यपी मुलाने घरातच केली चोरी, आईच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांची कारवाई, मुलाला केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोणताही कामधंदा न करता दारुसाठी आईकडे वारंवार पैसे मागणार्‍या ३२ वर्षाच्या मुलाने आपल्याच घरातील सोन्याचे ८५ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या या कृत्याने त्रासलेल्या आईने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी या मुलाला अटक केली आहे. राजेंद्र शिरीष देवकर (वय ३२, रा. वैष्णवी हाईटस, होलेवस्ती, उंड्री) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी ५२ वर्षाच्या महिलेला आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची वेळ आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या दोन मुलांसह उंड्रीत राहतात. राजेंद्र हा मोठा मुलगा असून तो काही एक कामधंदा करत नाही. त्याला दारुचे व्यसन असून सतत मित्रांसोबत फिरत असतो. त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करतो. पैसे दिले नाही तर त्यांच्याबरोबर आणि आपल्या लहान भावाबरोबर भांडणे करत असतो. फिर्यादी या ५ जून रोजी आपल्या छोट्या मुलासह धानोरीला नातेवाईकांकडे गेल्या होत्या जाताना त्यांनी घरातील बेडरुममधील लाकडी कपाटात दागिने ठेवले होते. त्यावेळी राजेंद्र हा एकटाच घरी होता.

सायंकाळी ५ वाजता त्या परत आल्या. त्यांनी कपाटात पाहिले तर त्यात सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यात सोन्याचा शाही हार, राणी हार, कानातील वेल असा ८५ हजार रुपयांचा ऐवज होता. त्यांनी त्याबाबत राजेंद्र याला विचारल्यावर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. छोट्या मुलानेही दागिन्याविषयी विचारल्यावर त्यालाही उडवाउडवीची उत्तरे देऊन तो घरातून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी राजेंद्रची बॅग तपासली. त्या बॅगेत त्यांना पायातील चांदीच्या पट्ट्या सापडल्या. तेव्हा राजेंद्रनेच दागिने चोरल्याची त्यांची खात्री झाली. गेले काही वर्षे मुलाच्या या व्यसनापायी त्रासलेल्या या मातेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. कोंढवा पोलिसांनी राजेंद्र देवकर याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत.